नुकतेच वर्तमान पत्रात वाचले परत पूर्वीप्रमाणे ५ वी पासून परीक्षा घेणार. काही वर्षापूर्वी मुलांना ताण नको , मुले आत्महत्या करतात म्हणून सगळ्यांना ८ वी पर्यंत पास करायचे. प्रशासन बदलले की ‘ तज्ञ ‘ बदलतात . नवीन ‘ फतवे ‘ निघतात . पण मुलांचा खरा विचार कोणी करतो का ? हा प्रश्न उपस्थित होतो. काहीना गणित नाही जमत , मग त्या एवजी दुसरा विषय द्या . मुलाला जे आवडते , आवडू शकते ते विषय निवडा मुलांवर विषयाची जबरदस्ती नको. मग काही सागतात गणित आवश्यक असते व्यवहारात ह्याला काही अर्थ नाही शिकलेल्या माणसापेक्षा भाजीवाली पटकन हिशेब करते.
मला आठवत आहे एका शाळेत एक विद्वान शिक्षक होते गणिताचे, ते विद्वान होते यात वाद नव्हता . परीक्षा झाली की ६० पैकी ५० तरी मुले नापस करावयाचे . सगळे हैराण ९ वी , १० वी च्या विद्यार्थ्याचे गणिताचे पेपर एकदम कडक तपासायचे , कंसात उत्तर नाही लिहिले किवा म्हणून ची चिन्हे नाही काढली की मुलगा लटकलाच समजावे , आई वडील हैराण, ज्या क्लासला जायचा ते क्लासवाले हैराण. आई वडलांचा संयम सुटायाचा त्यामुले मुलाचा आत्मविश्वास डळमळीत व्हावयाचा. पण तीच मुले बोर्डात चांगल्या गुणांनी पास व्हायची. हा माणूस कमी गुण देऊन आणखी अभ्यास करा असे सुचवायचा . पण प्रत्येक मुलगा सतत तणावाखाली असायाचा , पुढे हे वाढू लागले , शाळेला सरकारला इतकी मुले नापास का होतात जाब द्यावा लागे. शेवटी त्या शिक्षकालाच शाळेने व्यवस्थित समजावले. आपली मुले नापास का होतात हा विचार शिक्षकाने करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण सगळी मुले सारखी नसतात.
अनेक मुलांना पुस्तके नसतात , सरकार पुरवते पण वेळेवर पुरवते का ? सरकार तरतूद करते पण व्यवस्था सक्षम आहे का ? हा विचार कोण करणार . काही शाळा हुशार मुलांनाच घेतात कारण १० वी चा निकाल चांगला लागावा म्हणून कमी हुशार किवा ढ मुलांचा प्रश्न ‘ निकाली ‘ काढतात. हे अनेक ठिकाणी चालते, तक्रारी येतात , पण पुढे जास्त काही घडत नाही. खरे तर कुठलाच मुलगा ‘ ढ ‘ नसतो. सदोष शिक्षण व्यवस्थेमुळे तो समजला जातो ही गोष्ट जगजाहीर आहे पण चांगले निर्णय घेतले जात नाहीत किवा उशीरा घेतले जातात एखादा प्रंसग घडल्यावर. मी अशी अनेक मुले पाहिली आहेत १० वी ला जेमतेम पास होतात, एखादा व्यवसाय करतात आणि खरोखर यशस्वी होतात….हे असे का होते याचा विचार करण्याची वेळ आली आहे , कधी वाटते आपली सदोष शिक्षण व्यवस्था शिक्षणाचे महत्व कमी करत आहे का ?
Leave a Reply