सरकार जे धोरण ठरवते ते राबविण्यात येते , इथे राबवणे शब्दाला अनेक गोष्टीचा वास येतोच येतो आणि या मध्ये टार्गेट होतात ती प्रथम मुले आणि मग शिक्षक . आज लिहिताना मला विचार करायचा आहे तो दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील मुलांचा . घरी-दारी त्यांना उदहरण दिले जाते ते ८० टक्क्यावरील मुलांचे. ती हुशार मुले ह्या मुलांना हिंग देखील लावत नाहीत. कदाचित सावली देखील पडू देत नाहीत असे अनेक ठिकाणी आढळते. मग हळूहळू ह्या मुलांमध्ये वेगळीच भावना निर्माण होते , तो हुशार आहे पण बावळट आहे . विशेषतः तिसऱ्या फळींमधील मुले समजतात. कब्बडी , खोखो , किवा शाळेतील कठीण कामे असतील तर हे तिसरी फळी सर्वात पुढे. आणि पुढे एक वेगळेच टगेपण त्याच्यात निर्माण होते ही अवस्था आठवी पासून सुरवात होते. त्याचा बेबंदपणा वाढीला लागतो त्याला ‘ शायानिग ‘ हा शब्द हळूहळू कळू लागतो. नीट पहिले तर ही मुले फारशी श्रीमंत नसतात , क्लासच्या चाळीस-पन्नास हजार फी त्यांना परवडत नसते अर्थात अपवाद असतोच पण अपवाद म्हणजे नियम नसतो हे लक्षात ठेवावे. त्याच्या घरात पैशापासून अनेक अडचणी असतात, त्या समजतात पण कळत नाहीत. कुणीतरी सागाव्या लागतात अर्थात हे काम शिक्षकाचे असते पण शिक्षक त्याचाकडे वेगळ्या नजरेने बघत असतात एखादाच शिक्षक त्याचा पाठीशी उभा राहतो आणि ही मुले त्याला खुप मानतात. माझ्याकडे असाच गाववाला मुलगा होता , पुढे तो बिल्डर झाला बऱ्याच वर्षाने भेटला रस्त्यातच पायाला हात लवून म्हणाला सर ओळखले का मी ओळखले होते कारण त्याने माझा भरपूर मार खालेल्ला होता. थोडी विचारपूस झाल्यावर हातात कार्ड देवून म्हणाला सर काय कुणी त्रास दिला तर सांगा आपण आहोत. निघून गेला तो …..मी विचार केला असे मी काय दिले त्याला फक्त एक डिग्री तीसुद्धा १०वीची . शिक्षकाने मुलांना समजून घेतेले पाहिजे सतत हुशार मुलांकडे बोट दाखवणे बंद केले पाहिजे . माझ्याकडे बहुतेक डोंबिवलीमधील आबेंडकर नगर मधली मुले जास्त मुले होती. आमच्या सोसायटीमध्ये थोडी कुजबुज व्हायची पण काही जण माझ्या बाजूने होती. ह्या अशामुळे हुशार मुले माझ्या वाऱ्याला फिरकली नाहीत. मुले पण तशीच आणि मुलीही अतरंगच , पण त्यांच्याकडूनच मला खुप शिकायला मिळाले. आज बहुतेक मुली सासरी गेल्या आहेत. भेटल्या की म्हणतात त्यावेळी आम्हाला तुमचा खुप राग यायचा , रस्त्यात दिसलात की म्हणायचो तेथे नको जाऊ ‘ चाफ्या ‘ असेल , आत्ता जाणवते आम्ही चुकत होतो पण तुम्ही वेळीच सावरले . परंतु काही वेळेला मला अपयशही आले होते पण त्याचा विचार सोडून द्यायचो . मुलांच्या घरी मी नेहमी जायचो जर मुलगा क्लासला नाही आला तर , माझ्या सायकलवरून जायचो. कुठेतरी गादीवजा अंथरुणावर ती झोपलेली असावयाची , मी त्यांच्या घरी गेलो की झोपडीत धावपळ व्हायची , पोरग किवा पोरगी डोळे चोळत उठावयाची , मी दम देवून जायचो , दुसऱ्या दिवशी बरोबर यायची. एका सधन मुलाने माझी फी बुडवली अजूनही दिली नाही त्यावेळी निरोप पाठवला आमच्याकडून फी घ्यायची असेल तर खुप खेटे घालावे लागतील. मी नादच सोडला त्याचा. अशी बुडीत खाती खुप आहेत पण झोपडपट्टी मधील मुलाचा वेगळा अनुभव आला. त्याचे वडील वारले २६-२७ तारीख असेल. दोनचार दिवस आला नाही . तो दोन तारखेला आला , शांत होतो ७ वी मधला असेल . घरी जायची वेळ झाली. मी त्याची समजूत काढली. त्याने कपास उघडली १०० च्या दोन नोटा हातात ठेवल्या , म्हणाला सर आईने फी दिली आहे . विंचू हाताला डसावा तसा झटका बसला . हातात पैसे ठेवून तो निघून गेला…माझे पांढरपेशी मन हबकून गेले होते. मनात विचार आला शाळेचे तोंड कदाचित त्याचा आईने पाहिले असेल नसेल पण मलाच ती बरेच काही शिकवून गेली.
About satishchaphekar
14 Articles
मी सतिश चाफेकर. मी सह्याजीराव या नावानेही प्रसिद्ध आहे.. कारण माझा सह्यांचा संग्रह. यासाठी मला सहा वेळा लिम्का बुक ॲऑफ रेकॉर्डस मिळाले आहे.
Leave a Reply