स्नेहप्रभा विठ्ठल प्रधान यांचा जन्म १९१९-१९२० च्या सुमारास नागपूर यथे झाला . त्यांच्या आईचे नांव ताराबाई होते. त्यांचे आईवडील या दोघांनी सामाजिक क्षेत्रात आणि विशेषतः शिक्षणक्षेत्रात उल्लेखनीय काम केले होते. स्नेहप्रभा पप्रधान यांचे बालपण नागपूर , मुंबई , पुणे दिल्ली , कोलकता अशा अनेक ठिकाणी गेले. त्यामुळे त्यांचे शिक्षण अनेक गावांमधून झाले. त्यांना डॉक्टर व्हायचे होते , त्यामुळे त्या मुंबईला आल्या आणि त्यांनी मुंबईच्या ग्रँट मेडिकल महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला , काही कारणामुळे त्यांना डॉक्टर होता आले नाही. परंतु त्या नृत्य , संगीत, अभिनय या कलांमध्ये यशस्वी झाल्या. त्यामुळे ह्या कलांचा उपयोग त्यांना पुढे अभिनय क्षेत्रात मात्र झाला. बोंबे टॉकीज , मुरली मुव्हिटोन , रंजीत मुव्हिटोन , हिंदुस्थान मुव्हिटोन यासारख्या नावाजलेल्या चित्रपट संस्था त्यांना चित्रपटातील कामासाठी विचारू लागल्या.
१९३९ मध्ये चिमणभाई देसाई यांच्या बॉम्बे टॉकीजच्या सौभाग्य आणि सजनी या चित्रपटात साध्या भूमिका केल्या. परंतु १९४० साली आलेल्या बॉम्बे टॉकीजच्या ‘ पुनर्मिलन ‘ या चित्रपटात त्यांनी नायिकेची भूमिका केली. त्या चित्रपटाचे नायक होते किशोर साहू . पुढे याच किशोर साहू यांच्याशी स्नेहप्रभा प्रधान यांनी लग्न केले परंतु हे लग्न फार काळ टिकले नाही. त्यांच्या ‘ स्नेहांकिता ‘ या आत्मचरित्रात त्यांनी याबद्दल सविस्तर लिहिले आहे.
१९४२ साली स्नेहप्रभा प्रधान यांनी मा. विनायक यांच्या ‘ पहिली मंगळागौर ‘ या चित्रपटात भूमिका केली. या चित्रपटाचे नायक होते शाहू मोडक. याच चित्रपटात लता मंगेशकर यांनी बालकलाकार म्हणून काम केले होते. ह्या चित्रपटात स्नेहप्रभा प्रधान आणि लता मंगेशकर यांनी एक गाणे गायले होते. पुढे त्यांनी परेश बॅनर्जी नायक असलेल्या ‘ दिनरात ‘ या चित्रपटात काम केले. तर श्याम हा नायक असलेल्या ‘ शिकायत ‘ या चित्रपटात त्यांनी काम केले. स्नेहप्रभा प्रधान यांनी ‘ कालिदास ‘ या चित्रपटात पहाडी सन्याल याच्याबरोबर देखील काम केले. त्यांचा ‘ प्यास ‘ नावाचा चित्रपटही आला होता. २५ डिसेंबर १९४६ रोजी स्नेहप्रभा प्रधान यांच्या आईंचे निधन झाले, आणि स्नेहप्रभाबाई पूर्णपणे खचल्या. त्यांनी एकदा आत्महत्येचाही अपयशी प्रयत्न करून पाहिला.
१९५० साली त्यांनी देव आनंद , नर्गिस यांच्या ‘ बिरही की रात ‘ या चित्रपटात भूमिका केली होती. १९५० पासून त्या चित्रपट क्षेत्रातून निवृत्त झाल्या. १९४९ साली त्यांनी ‘ झुंझारराव ‘ या नाटकातून पहिल्यांदा भूमिका केली. त्यानंतर अ . वा. वर्टी यांच्या ‘ राणीचा बाग ‘ या नाटकात त्यांनी काम केले . त्यानंतर लग्नाची बेदी , रत्नाकर मतकरी यांचे ‘ अस्ताई ‘ , सुमती धनवरे यांचे ‘ धुळीचे कण , विद्याधर गोखले यांचे ‘ साक्षीदार ‘ अशा नाटकांतून त्यांनी भूमिका केल्या. त्याचप्रमाणे ‘ प्रभा थिएटर ‘ ह्या नावाची त्यांनी स्वतःची नाट्यसंस्था स्थापन करून सौभद्र, संशयकल्लोळ अशी नाटके रंगभूमीवर आणली.
स्नेहप्रभा प्रधान यांनी ‘ सर्वस्वी तुलाच ‘ हे आत्मचरित्र असलेले नाटक लिहिले आणि त्यात त्यांनी भूमिकाही केली. इ.स. १९५०च्या नंतर त्यांनी पुढची काही वर्षे मराठी नाट्यसेवेसाठी आणि इतर सामाजिक कार्यासाठी खर्च केली. आयुष्यभर समाजसेवा करणाऱ्या, आणि तीपण भारतीयांमध्ये साक्षरतेचाचे प्रसार करण्याच्या कार्यक्षेत्रात, आणि ते करताना स्वत:चे सांसारिक जीवन धडपणे न उपभोगता येणाऱ्या आईबाबांची मुलगी असलेल्या स्पष्टवक्त्या आणि कणखर स्नेहप्रभा, मात्र शेवटपर्यंत स्वतंत्र, पुरोगामी आणि बिनधास्त जीवन जगल्या .
मला आठवतय त्या वेळी आबा देशपांडे हे दूरदर्शनवर ‘ ज्ञानदीप ‘ नावचा लोकप्रिय कार्यक्रम करत असत , त्या कार्यक्रमातर्फे काही मिटींग्स होत त्या दोन-तीन मिटींग्सला मी गेलो होतो तेव्हा तिथे स्नेहप्रभाबाई येत असत. तेव्हा त्या सांगत की त्यांना कुत्रा – मांजर हे आवडत असत. त्यांना कुत्र्या-मांजराचे आणि अन्य प्राण्यांचे खूप प्रेम होते . त्यावेळी भटक्या कुत्र्यांना मारले जायचे त्याविरुद्धही त्या सांगत असत. प्राणी मारणं ही कल्पनाच त्यांना सहन होत नव्हती.
स्नेहप्रभा प्रधान यांनी पळसाला पानं तीन हा ललित लेखसंग्रह लिहिला , रसिक प्रेक्षकांस सप्रेम ह्या पुस्तकातमध्ये त्यांच्या भूमिकांचे विश्लेषण करणारे लेख होते , सर्वस्वी तुझाच हे नाटक लिहिले . त्यांचे ‘ स्नेहांकिता ‘ हे आत्मचरित्र त्यांच्या पुरोगामी , स्वतंत्र शैलीच्या वृत्तीमुळे खूप गाजले .
स्नेहप्रभा प्रधान यांनी पुनर्मिलन , पहिली मंगळागौर , सजनी , सिव्हिल मॅरेज , सौभाग्य या चित्रपटांमधून कामे केली. त्याचप्रमाणे त्यांनी पहिली मंगळागौर आणि पुनर्मिलन या चित्रपटांमधून गाणी गायली.
१९५० नंतरची काही वर्षे त्यांनी मराठी नाट्यसेवेसाठी व इतर सामाजिक कार्यासाठी खर्च केली. नंतरची आयुष्याची शेवटची वर्षे ४० वर्षे मात्र, त्यांनी आपले जीवन प्रसिद्धिपराङ्मुखपणे आणि शांतपणे व्यतीत केले.
स्नेहप्रभा प्रधान यांचे ९ डिसेंबर १९९३ रोजी निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply