दिलीप पुरषोत्तम चित्रे यांचा जन्म १७ सप्टेंबर १९३८ रोजी बडोदा यथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण बडोदा येथेच झाले. त्यांचे वडील पु. आ. चित्रे हे बडोद्यातून अभिरुची ‘ मासिक चालवत असत. १९५१ पासून दिलीप चित्रे हे मुबईला राहू लागले .रुईया कॉलेजच्या ‘ रुईयाटन ‘ या वार्षिकातून तसेच ‘ भिंतीपत्रकातून सातत्याने त्यांनी लेखन केले. त्यांनी १९६१ मध्ये रुईया महाविद्यालयातून आर्टस् मधून पदवी घेऊन शिक्षण पूर्ण केले. १९६० ते १९६३ पर्यंत त्यांनी इथोपियात नोकरी केली. १९६४ मध्ये ते मुंबईला परत आले आणि त्यांनी जाहिरात क्षेत्रात नोकरी , पत्रकारिताही करू लागले. त्यांनी ‘ अँन अँनथालॉजी ऑफ मराठी पोएट्री ‘ १९६८ साली ‘ ऑर्फियस हा कथा संग्रह लिहिला. त्याचप्रमाणे ‘ शिबा राणीच्या शोधात ‘ हे १९७१ साली आत्मचरित्रात्मक प्रवासवर्णन लिहिले. ‘ आधुनिक कवितेतील सात छेद ‘ हही लेखमाला लिहून परदेशी कवींच्या काव्यविश्वाचा परिचय मराठी वाचकांना करून दिला. घरात साहित्याचे वातावरण असल्यामुळे त्यांनी लहानवयातच काव्यलेखनास सुरवात केली. त्यांची पहिली कविता ‘ सत्यकथे ‘ च्या १९५४ च्या दिवाळी अंकात प्रकाशित झाली. पुढे त्यांना ‘ सत्कथेचे ‘ मौजेचे कवी म्ह्णून ओळखले जाऊ लागले.
इंग्रजी वृत्तपत्रे आणि नियतकालिके यातून त्यांनी राजकीय , सांस्कृतिक विषयांवर खूप लेखन केले. दिलीप चित्रे यांनी चित्रकलेविषयी खूप लेखन केले आणि १९७८ साली ‘ गोदाम ‘ या चित्रपटाचे कथालेखन-दिग्दर्शन आणि संगीत दिग्दर्शनही त्यांनी केले.
दिलीप चित्रे यांनी चाव्या , तिरकस ,शतकाचा संधीकाल ही त्यांची सामाजिक आणि राजकीय स्थितीवरची भाष्ये आहेत. दिलीप चित्रे यांनी मिठू मिठू पोपट , सुतक ही नाटके लिहिली. ‘ चतुरंग ‘ हे चार लघुकादंबऱ्यांचे संकलनही केले. त्यांनी ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवाचा अनुवाद केला त्याचप्रमाणे त्यांनी ‘ पुन्हा तुकाराम ‘ , ‘सेज तुका ‘ असे मराठी-इंग्रजी त्यांनी तुकारामांच्या कवितांचे अर्थ उलगडून दाखवले . १९६१ साली दिलीप चित्रे यांनी कविता आणि १९७८ साली कवितेनंतरच्या कविता ‘ हे दोन वेगळे काव्य संग्रह लिहिले. ‘ ट्रॅवलिग इन अ क्रेज ‘ , दहा बाय दहा , एकूण कविता १ , एकूण कविता २ असे विस्तृत लेखन केले.
दिलीप चित्रे त्यांनी लघुपत्रिकांमधून खूप लिहिले . ते लघुपत्रिका चळवळींमधील सक्रिय कार्यकर्ते होते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यांनी कविता , कथा, समीक्षा, आणि स्फुट तसेच अनुवाद असे लेखन केले. जुन्या मराठी कवितांपासून ते आधुनिक युरोपीय कवितेपर्यंत सर्व प्रकारच्या काव्यप्रकार त्यांनी वाचले , त्यांचे चिंतन करुन त्यांनी निर्मिती केली. त्यांचे लेखन अत्यंत चिंतनशील तर होतेच पण कालानुरूप होते , म्हणण्यापेक्षा काळाच्या पुढेही होते. मराठी काव्यविश्वाच्या केंद्रस्थानी तुकाराम आणि इतर कवी त्या परिघाच्या छायेत आणून एकप्रकारची वेगळी उलटापालट दिलीप चित्रे यांनी घडवून आणली. मर्ढेकरांना ज्याप्रमाणे ज्ञानोबा-तुकाराम यांच्याशी जोडले गेले त्याचप्रमाणे दिलीप चित्रे यांनाही जोडले गेले.
संत कवींपासून परदेशी कवीपर्यंत दिलीप चित्रे यांच्या चिंतनाची झेप आहे. ‘ पुन्हा तुकाराम ‘ आणि सेज तुका ‘ द्वारे तुकारामांची कविता जागतिक पातळीवर त्यांनी नेली. भाषा , समाज आणि संस्कृती , साहित्य , आणि मुख्यतः काव्य , यासंबंधी वेगळी अशी मर्मदृष्टी घेऊन दिलीप चित्रे यांनी लेखन केले. त्यांच्या लेखनात सवेदना , प्रतिमा यांचे अद्भुत आणि तर्काला न उलगडणारे मिश्रण त्यांच्या साहित्यात आढळते. मला आठवतंय त्यांच्या कविता , त्यांचे विचार मी कॉलेजला असताना प्रत्यक्ष ऐकले होते. खरे तर त्यावेळी माझे वाचन त्या मानाने तोकडे असल्यामुळे मला ते जे काही सांगत ते कळण्यास बऱ्यापैकी वेळ लागे. आजही दिलीप चित्रे यांच्या कवितांचे गारुड नवीन पिढीला अस्वस्थ करते.
जीवनाची दुबोधता आणि व्यामिश्रता हे दिलीप चित्रे यांचे आकलन आहे आणि त्याचप्रमाणे ते व्यक्त करताना तेवढीच व्यामिश्रता आणि काही प्रमाणत दुर्बोधता त्यांच्या लिखाणात आली.
मराठी साहित्यात इतर कलांची परिमाणे देणारा , समकालीन युगभान आणि मानवी संस्कृतीच्या आरंभापासून प्रवाहित होत आलेले आदिबंध यांची एकत्रित जाणीव करणारा असा लेखक अशीच दिलीप चित्रे यांची ओळख करून द्यावी लागेल.
अशा दृष्ट्या आणि कालबंध जोडणाऱ्या लेखकाचे , कवीचे १० डिसेंबर २००९ रोजी निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply